औरंगाबाद: दोन वर्षांचा चिमुकला पडला गुलाबजामुनच्या गरम पाकात

Foto

औरंगाबाद -  गुलाबजामुनसाठी तयार करण्यात आलेल्या गरम पाकाच्या कढईत पडून दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शहरातील दलालवाडी भागात गुरुवारी ही घटना घडली होती, सोमवारी पहाटे उपचारादरम्यान बालकाचा मृत्यू झाला.  

दलालवाडी भागात राहाणारे मेघावाले यांच्या घरी गुरुवारी (ता. २३) धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी घराजवळच स्वंयपाकाची तयारी सुरु होती. सर्व कुटुंबिय कार्यक्रमात व्यस्त असताना दोन वर्षांचा राजवीर नितीन मेघावाले हा खेळत-खेळत गरम पाकाच्या कढईत पडला. त्याला तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. नंतर त्याला घाटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. गरम पाकात पडल्याने दोन वर्षांच्या राजवीरचे संपूर्ण शरीर भाजले होते.  घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना सोमवारी सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात  हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाची क्रांतिचौक पोलिस स्टेशनमध्ये नोंद घेण्यात आली आहे.